युनूस राजीनाम्याच्या तयारीत ?   

ढाका : बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मोहमद युनूस राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सरकार चालविण्यासाठी राजकीय मतैक्य घडविण्यात अपयश आले आहे. बांगलादेश- म्यानमार दरम्यानच्या मार्गिकेच्या विषयावरुन लष्कर आणि सरकार यांच्यात संघर्ष उफाळून आला आहे. विविध मोर्चावर सरकार अपयशी ठरत असल्यामुळे युनूस पदाचा राजीनामा देत असल्याचे वृत्त आहे. 
 
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन पक्षाचे प्रमुख नाहीद इस्लाम यांनी बीबीसी बांगला वृत्तसेवेला सांगितले की, राजकीय परिस्थितीवर युनूस नाराज आहेत. त्यामुळे ते देशाचे नेतृत्व करण्यात यशस्वी ठरणार नाहीत. बांगलादेश सरकार आणि लष्कर यांच्यात देखील सार्वत्रिक निवडणुका केव्हा घ्याव्यात, यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. इस्लाम यांनी असेही सांगितले की, युनूस राजीनामा देण्याचा विचार करत असून मात्र, अधिकृत निवेदन सरकारकडून आलेले नाही..  
 
दरम्यान,  गेल्या वर्षी जुलैमध्ये माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे  सरकार खाली खेचण्यात इस्लाम याची भूमिका महत्त्वाची होती. हसिना यांना राजीनामा देणे भाग पडले होते. सामूहिक चळवळीवेळी युनूस यांनी खंबीर राहावे, असे त्यांनी सूचविले देखील होते. त्यांना सर्वजण सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

कारणे काय?

सर्व पक्षात मतैक्य घडविण्यात अपयश
लष्करप्रमुख वकार उज झमा यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप
अमेरिकेची बांगलादेशात लुडबूड 
बांगलादेश - म्यानमार मार्गिकेच्या जमीन अधिगृहाणाला सरकारची संमती, मात्र, मार्गिकेला लष्कराने तीव्र विरोध केला असून डिसेंबरपूर्वी सार्वत्रिक निवडणूक घ्या नंतर निर्णय घ्या, असे स्पष्ट शब्दांत बजावले आहे.

मार्गिकेला लष्कराचा विरोध

बांगलादेश -म्यानमार सीमेवर राखीन जिल्ह्यात मानवतावादी मार्गीका बांधण्याच्या योजनेला लष्कराचा तीव्र विरोध आहे. परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी जाहीर केले होते की अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या राखीन मार्गीकेला सरकारने सहमती दर्शविली आहे यानंतर  लष्करप्रमुख वकार यांनी मार्गीकेचे वर्णन रक्तरंजित मार्गीका असे केले आणि  सरकारला इशारा दिला की, बांगलादेश सैन्य कधीही सार्वभौमत्वाला हानी पोहोचवणार्‍या कोणत्याही कृतीत सहभागी होणार नाही. तसेच तशी परवानगी दिली जाणार नाही. यानंतर सरकार नमले होते. 
 

Related Articles